बंद

महत्वाची ठिकाणे

शेगांवात सर्वत्र असलेले पाण्याचे दुर्भिक्ष पाहतां. जर परिसरातील तलाव पाण्याने भरुन राहिला तरच गावातील पाण्याची गरज भागू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असतां, संस्थानने मन नदितून पाणी आणून या तलावात सोडण्याची योजना हाती घेतली. दोन कोटीहून जास्त या योजनेत दर महा होणारा पन्नास लाखांपर्यंतचा खर्च संस्थानच्या आर्थिक कार्यक्रमांमध्ये न बसणारा असा.

तेव्हा या तलावास मध्यवर्ती ठेवून त्याच्या आजूबाजूचा परिसर विकसीत केला असतां व तेथे अध्यात्मिक केंद्र तसेच मनोहारी उद्यान निर्माण केल्यास येणाऱ्या महसुलातून पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडवता येईल या हेतूने आनंदसागर प्रकल्पाची निर्मीती झाली.

नजरेतही साठविता न येणारे, उत्कृष्ट कलाकृतींच्या अजोड कारागीरीने मन थक्क करणारे असे आनंसागरचे भव्य प्रवेशद्वार. विविध रंगाची मनमोहक पखरण करणारी रंगीबेरंगी फुले पहात, सभोवताली चाफ्यांच्या फुलांचा मंद दरवळ घेत आपण या प्रवेशद्वारातून आत शिरतो ते पावलांपावलांवर आश्चर्याने थक्क होण्यासाठीच.

संत मंडप

प्रवेशव्दारातून खाली येताच समोर आनंदसागर परिसराचे विस्तीर्ण क्षेत्र दिसते. आजुबाजूस गच्च व गर्द झाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, कारंज्यातून उसळणारे व लयबध्द स्वरात झुळझुळणारे पाणी सोबत घेऊनच आपण विस्तीर्ण अशा संतमंडपात प्रवेश करतो. या अर्धवर्तुळाकार, भव्य अशा संतमंडपात १८ राज्यातील १८ संतांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत. मध्यभागी विस्तीर्ण परिसरात कारंज्यातून उसळणाऱ्याा पाण्यांचे तुषार अंगावर झेलीत प्रसन्न भावमुद्रेत बसलेली श्री गजानन महाराजांची भव्य मुर्ती मन मोहून नेते . आद्य शंकराचार्य, मिराबाई तसेच संत कबीर, ताजुद्दीनबाबांपर्यंतचे विविध राज्यातील संत व त्यांची उद्बोधक वचने येथे पहावयास मिळतात.

आनंदसागरचा भव्य परिसर पाहणाऱ्यांसाठी संस्थानने ठिकठिकाणी थंड पाण्याची सोय केली आहे तसेच उन्हापासून संरक्षण करणाऱ्याा छत्र्यांची विनामुल्य विशेष व्यवस्था केली आहे. आनंदसागरचा भव्य परिसर सहजतेने पहाण्याचा आनंद विकलांगांनाही लुटता यावा यासाठी संस्थानने खास व्हील-चेअर्सची सोय करून दिली आहे. त्याचबरोबर या परिसरात रममाण होणाऱ्याा लहानग्या बाळांसाठी बाबागाड्यांची सोय उपलब्ध करून देताना संस्थान, प्रत्येक व्यक्तीचा अगदी सुक्ष्मपणे व जिव्हाळ्याने कसा विचार करते याची झलक आपणांस पहावयास मिळते, शिवाय छोट्या रेल्वेगाडीत बसून पूर्ण परिसराचे अवलोकन करता येते.

वास्तविक पाहतां वैदर्भीय भूमीवर निसर्गाचे तसे दुर्लक्षच झाले आहे. पर्जन्यवृष्टीचा अभाव व वातावरणातील दाह यामुळे एकंदरच हा परिसर रखरखीत भासणारा. मात्र स्वकर्तृत्वाने या निसर्गासही आपलेसे करून मानवी हातांनी या दगडांमधून घडवलेली शिल्पे व उजाड मातीमधून फुलविलेल्या बागा म्हणजेच जणू जिवाशिवाचे अद्भुत मिलनचं. याच भूमीतील तलावाच्या काठावर संस्थानने ‘आनंदसागर‘ नावाचं एक अशक्यप्राय असं स्वप्न पाहिलं, स्वत:च्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान बाळगत ते साकारलं आणि पाहतां पाहतां सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपाशिर्वादाने पृथ्वीवर जणू स्वर्गच उतरला.

विश्रांती स्थळ

आनंदसागरच्या नयनरम्य परिसराचा आस्वाद घेतांना अधून मधून विश्रांतीची आवश्यकता भासते अशा वेळेस पाय आपसुकच विश्रांतीस्थळाकडे वळतात. आनंदसागरमध्ये जागोजागी अप्रतिम कलाकुसर असलेली, नक्षीदार खांबांनी सजलेली विश्रांतीस्थळे पहावयास मिळतात. व्दारकाबेट तसेच श्री विवेकानंद ध्यानकेंद्र येथे जाण्याच्या मार्गावर अशाच प्रकारची विश्रांतीस्थळे उभारली आहेत. येथे विश्रांतीसाठी लाकडी बाकडे ठेवली असून आजूबाजूचा परिसर गर्द लता, वेलींनी आच्छादलेला असून सभोवताली दिसणाऱ्याा रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांकडे पहाताक्षणीच शरीराला आलेला थकवा नाहीसा होतो व मरगळलेल्या पावलांना नवी उभारी मिळून पाय आपसूकच लगबगीने ध्यानकेंद्राकडे आकर्षिले जातात.

आनंदसागर या मनोहारी उद्यानाचा पाया अध्यात्मिक वारसा व उच्च वैभवशाली हिंदु संस्कृतीवर आधारीत आहे हे आपणांस पावलोपावली जाणवते. राज्यातील तसेच जगभरातील विविध संप्रदायातील संत, महंतांचे पुतळे जागो-जागी उभारण्यात आले आहेत. संस्कृति व संस्कार यांचे महत्व अधोरेखित करणाऱ्याा वचनांचे फलक आपले ज्ञान अधिक समृध्द करतात. येथील उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेली मंदिरे. श्रीगणेश मंदिर, श्री शिव मंदिर, नवग्रह मंदिर आदि महान देवतांची आकर्षक अशी ही मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा एक अजोड नमूनांच ठरावा. अप्रतिम कलाकुसर, नक्षिदार खांब व आकर्षक कोरीव कमानी असलेली ही शिल्पे पाहून त्यांना दगडातून साकार करणाऱ्याा त्या अनामिक शिल्पकाराच्या कलेला दाद देण्यासाठी हात नकळतचं जोडले जातात.

झुलता पुल

निसर्ग व मानव एकत्र आल्यावर काय घडू शकते यांचे प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर द्वारकाबेटाकडे आपणांस नेणारा झुलता पुल पाहावांच लागेल. तलावावर उभारलेल्या लांब लचक पुलावरुन जात असता रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आपल्या मंद सुगंधाची पखरण करत आपली साथसोबत करतात आणि आपण पोहचतो या झुलत्या पुलापासी. डौलदार पिसारे फुलवणारा मत्त मयुर व चंदेरी झळाळी ल्यायलेल्या मासोळ्या यांची प्रतिके असलेला हा झुलता पुल आपल्याला थक्क करुन सोडणारा. शेगांव सारख्या आडवळणी गांवी मोठमोठ्या शहरातूनही अभावानेच आढळणारी ही कारागिरी नक्कीच कौतुकास्पद व उत्स्फूर्तपणे दाद देण्याजोगी

स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र

अम्रुर्त तत्वाला चिरंजिवित्व बहाल करुन निर्माण होऊ घातलेल्या ‘आनंदसागर ‘ या पृथ्वीवरील नंदनवनाच्या अद्वितीय कलाकृतीचा परमोच्च बिंदू म्हणजे स्वामी विवेकानंद ध्यानकेंद्र. ‘ध्यान साधनेतून परमार्थ‘ ही नवी तत्वप्रणाली उभ्या जगाला देतांना स्वामीजींनी प्रत्येक भाविकाला मोक्षाच्या चरणसीमेपर्यंत सहजतेने आणलं. आनंदसागरचे स्वर्गीय वैभव अष्टदिशांमधुन पहातांना थक्क झालेलं आपल मन येथील ध्यानकेंद्रातील शांत व मंगलमय वातवरणात पवित्र होतं यात शंकाच नाही.

आपल्या मनातील शातंता व स्थैर्य आणि स्वामीजींच्या चेहऱ्या वरील शांत, नितळ व स्निग्ध भाव याचं अद्वैत साधलं जातं आणि आनंदसागरच्या रम्य वातावरणात डूंबून गेलेल मन पृथ्वीवर सहजरीत्या मिळणाऱ्या या स्वर्गसुखांतच रममाण होतं.

मत्स्यालय

संतमंडपातून उजव्या बाजूस थोडे अंतर चालून गेल्यावर एका विस्तीर्ण परिसरात उभे असलेले मत्स्यालय दिसते. भारतात आढळणाऱ्यां शोभीवंत माशांच्या विविध प्रजाती तसेच मोठे मासे, कासव आदि या मत्स्यालयात पहावयास मिळतात. अंधाऱ्या गुहेचा आभास करुन देणाऱ्यां या मत्स्यालयातील बोगद्यांमध्ये असलेल्या छोटया-मोठ्या पोकळ्यांतून विद्युत झोतात दिसणारे हे रंगीबेरंगी लहान-मोठ्या आकाराचे मासे पाहून बच्चे कंपनीस, आपण एखाद्या वेगळ्याच जल-विश्वात आलो असल्याचा भास न झाला तर नवलचं.

बालोद्यान

संतमंडपाच्या डाव्या बाजूस बालोद्यान असून येथेही झोपाळे, घसरगुंड्या, रोलरकोस्टर, यासारखे नानाविध अत्याधुनिक खेळांचे प्रकार लहान मुलांना उपलब्ध करुन दिले गेले आहेत. विस्तीर्ण अशा या परिसरात एका वेळेस हजारो मुले खेळु शकतील इतके खेळांचे प्रकार व सुविधा उपलब्ध असून हा परिसर झाडा-झुडपांनी व लता-वेलींनी आच्छादलेला आहे. येथे लहानच काय तर मोठ्यानांही क्षणभर आपले वय विसरुन खेळण्यातला आनंद लुटावासा वाटतो व क्षणभर ‘बालपण‘ मुक्तपणे उपभोगावसं वाटतं.

आनंदसागरच्या रमणीय परिसरामध्ये लक्ष वेधून घेतात ती जागोजागी आढळणारी अप्रतिम शिल्पे. विविध देवी-देवता, संत-महंत, महापराक्रमी योध्दे इतकेच काय तर प्राणीमात्रांचीही जिवंत भासणारी शिल्पे, आपणांस थक्क करुन सोडतात. इथल्या मातीत जन्मलेल्या या कलाकारांच्या या कौशल्याला, देवदत्त प्रतिभेला संस्थानने आत्मविश्वासाचे पाठबळ दिले व प्रोत्साहित केले आणि पाहतां पाहतां या विश्वकम्र्याच्या वंशजांनी पृथ्वीवर आनंदसागरच्या रुपाने ‘मयसृष्टी‘ निर्माण केली.

कोरीव कलाकुसरीने नटलेल्या कमानी, शैलीदार पध्दतीचे आखीव-रेखीव खांब यामधून आपल्यातील दैवी प्रतिभेचं जन्मजात लेणं चोहोअंगांनी उधळणाऱ्या या शिल्पकारांनी ‘आनंदसागर‘ च्या रुपाने जे शिल्प प्रत्यक्षात साकार केलं त्याचं वर्णन फक्त एकाच वाक्यात करता येईल, ते म्हणजे ‘न भूतो न भविष्यती‘.

अ‍ॅम्पी थिएटर

देशातील काही मोजक्याच ठिकाणी आढळणाऱ्या खुल्या रंगमंचापैकी एक रंगमंच आनंदसागरच्या परिसरामध्ये उभा राहिला आहे. अद्ययावत ध्वनी व प्रकाशयोजना तसेच विस्तिर्ण रंगमंच लाभलेला हा अ‍ॅम्पी थिएटरचा परिसर लक्षात राहतो तो त्याच्या भव्यतेमुळे. येथे धार्मिक, अध्यात्मिक स्वरुपाचे कार्यक्रम तसेच किर्तन- प्रवचनादी संस्कृतीदर्शक सादरीकरणाचे प्रयोग व्हावेत आणि त्याव्दारे भाविकांना आपल्या उच्च व सामथ्र्यशाली हिंदु संस्कृतीचे आकलन व्हावे हा यामागचा संस्थानचा हेतू आहे.

या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये बैठक व्यवस्था करतांनाही सिमेंटची बाके किंवा प्लस्टिकच्या खुच्र्यांमुळे येणारा रुक्षपणा टाळून चक्क ही उतरती बैठक व्यवस्था हिरवळीने आच्छादलेली आहे. या बैठकींच्या उंच कमानीवर संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद आदि संताचे तसेच श्री छत्रपती शिवराय व राणा प्रताप यांसारख्या अनेक महापराक्रमी वीरांचे पुतळे उभारले आहेत.

भोजनव्यवस्था,कॉफीहाऊस

या भव्य परिसरामध्ये येथे येणाऱ्या सर्वांच्या क्षुधाशांतीसाठी अनेक उपहारगृहे, कॉफीशॉप्स यांची व्यवस्था केलेली आहे. या उपहारगृहामधून नाश्ता, चहा, कॉफी, सरबत तर मिळतेच शिवाय विविध प्रांतातील वैशिष्ट्य जपणाऱ्या खाद्यपदार्थाची चवही चाखावयास मिळते. आनंदसागरच्या प्रवेशव्दारापाशी भोजनकक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तसेच आनंदसागर परिसरामध्ये असलेल्या भव्य व विस्तृत भोजनकक्षामधून आपण भोजनाचा आनंद घेऊ शकतो. आनंदसागरच्या प्रवेशव्दारापाशी भव्य पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली असून एकाच वेळेस शेकडो वाहने येथे विनासायास उभी राहू शकतात.

अजिंठा पर्वत रागांमध्ये अध्यात्मिक पातळीवर नावाजलेला अन् निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमुळे गिरडा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो

बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी मार्गावर गिरडा हे गाव आहे. प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे. स्वयंप्रकाशबाबांच्या समाधीस्थळामुळेही गावाला अध्यात्मिक महत्‍त्व आहे. पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला. त्यातून पाच झरे निर्माण झाले. तेच पाणी गोमुखातून आजपर्यंत अव्याहतपणे बाहेर पडते, अशी अख्यायीका सांगितली जाते.

पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्‍त्व लक्षात घेत अध्यात्मिक केंद्राला पर्यटनाची जोड मिळाल्यामुळे आता या परिसरात सहलींचे आयोजनही केले जाते.

ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे.

अंबाबरवा अभयारण्य

अंबाबरवा नावाचे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सुमारे १२७ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे.

जिल्ह्य़ातील सातपुडा पर्वत रांगामध्ये, मध्यप्रदेश व मेळघाटच्या सीमावर्ती भागात असलेले अंबाबरवा अभयारण्य नैसर्गिक वैविध्यपूर्ण संपत्तीचे वरदान असून हे अभयारण्य जिल्ह्य़ातील प्रमुख वन पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते.

शहराला लागून असलेल्या बुलढाणा-मलकापूर रस्त्यावरील राजूर घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून परिसरातील असलेल्या विविध मंदिरे, नदी, नाल्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

अजिंठ्याच्या डोंगरात वसलेल्या बुलढाणा शहर परिसराला अलैकिक सौंदर्याची देण असल्यामुळे तसेच थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात येथूनच जिल्ह्याचा कारभार सुरू केला होता. दरम्यान स्वातंत्र्यानंतर बुलढाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळाला. आज रोजी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी शहर परिसरात असलेले नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी परिसरातील पर्यटक प्रेमींना खुणवत असते.

बुलढाणा शहरातून मलकापूरकडे जात असताना सर्वप्रथम व्यंकटगिरी बालाजीचे मंदिर आहे. तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत. राजूर घाटात एका वळणावर संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या ठिकाणाहून बुलढाणा शहर परिसर तसेच राजूर घाटातील डोंगराचे सौंदर्य निहाळता येते. त्यानंतर मोताळा तालुक्यातील राजूर गावाकडे जाताना घाटातच दुर्गामाता मंदिर आहे.

या परिसरात खोल दरीतील पाणी साठवलेला नाला, सर्वत्र डोंगराने पांघरलेला हिरवा शालू तसेच मोताळा शहरासमोर असलेल्या नळगंगा धरणाचे पाण्याचे विशाल पात्र निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घातले. या ठिकाणाहून सूर्योदय तसेच सुर्यास्तचे दर्शन घेताना वेगळी अनुभुती मिळते. त्यानंतर मोहेगाव समोर असलेल्या तालुका पर्यटन केंद्र तसेच त्यापुढे असलेल्या जमिनीखाली १५ फुट खोल असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या परिसरात नळगंगा नदीचे वाहणारे पाणी, परिसरातील हिवराई मनाला सुखावून जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात बुलढाणा शहर परिसरातील अजिंठ्याच्या डोंगरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना हाक देत असते. या ठिकाणी इतर जिल्ह्यातील येणारे पर्यटकांनी भेट दिल्यास परत परत येथील निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.